जि.प.पू.प्रा.शाळा मढाळ नं.३सोलकरवाडी ता.गुहागर जि.रत्नागिरी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Showing posts with label मढाळ. Show all posts
Showing posts with label मढाळ. Show all posts

Wednesday, 2 March 2016

मढाळ गाव सर्वसाधारण माहिती

१) भौगोलिक -- मौजे मढाळ हे गाव अरबी समुद्राच्या  पूर्वेला अंदाजे ३० कि.मी.अंतरावर  आहे.मढाळ गावाच्या  पूर्वेला चिपळुण तालुक्यातील मार्गताम्हाणे व कळमुंडी ही गावे आहेत.दक्षिणेस  पाली व उत्तरेस  झोंबडी तर पश्चिमेस  सुरळ ही गावे आहेत.गुहागर हे तालुक्याचे ठिकाण  आहे  तर शृंगारतळी व मार्गताम्हाणे ही बाजाराची गावे आहेत.गावाला पोस्ट  मार्गताम्हाणे येते आहे. जिल्ह्याचे ठिकाण  रत्नागिरी  हे सुमारे १०५ कि.मी. अंतरावर  आहे.

२)  पर्जन्यमान  व पिके -- मढाळ गावाच्या  पूर्वेस मोठा डोंगर  आहे. त्यामुळे  मोठ्या  प्रमाणात पाऊस  पडतो.गावातून  वाहणारी " युगंधरा " ही नदी पावसाळ्यात  दुथडी भरुन वाहत असते. भात हे येथील  मुख्य पिक आहे .त्याच बरोबर  नाचणी, वरी, तीळ, भुईमुग, उडीद, कुळीथ इ.पिके मोठ्या  प्रमाणावर  घेतली जातात .उन्हाळ्यात  भाजीपाला  केला जातो.

३)  ऐतिहासिक --  वडिलधारी मंडळींच्या सांगण्यावरून  या गावातील सोलकर व शिर्के यांचे  पुर्वज शिवाजी महाराजांच्या  सैन्यात  शुर योध्दे म्हणून नावारुपाला आले होते.संभाजी महाराजांच्या  पावलांचा स्पर्श  या गावाला झालेला  आहे. पांडवकालीन स्थापलेले काळेश्री देवीचे मंदिर  ही येथे आहे.

४) सामाजिक -- गावात अनेक जातीचे व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र  नांदतात. सण , समारंभ , उत्सव ,राष्ट्रीय सण ,शासकीय योजना  एकात्मता  व विकास  या भावनेने प्रेरित  होऊन राबवतात. गावातील  समाजाच्या  एकसंघ  भावनेमुळेच गावाला सन २००५/०६ चा हागणदारी मुक्त  गाव म्हणून रोख  ५००००/- रुपये  पारितोषिक  मिळाले आहे .त्याचबरोबर  एकमेकांच्या  सहकार्याने  सन २००६/०७ या वर्षी  जलस्वराज्य सारखा अत्यंत  महत्वाकांक्षी प्रकल्प  राबवून यशस्वीपणे  पूर्ण  केला.

५)  सांस्कृतिक -- मढाळ गावात हिंदू संस्कृती  व बौद्ध संस्कृती  एकत्र व एकोप्याने नांदताना दिसतात.गणेशोत्सव, होळी, दसरा, बौद्ध जयंती इ. सण समारंभ  एकोप्याने साजरे होतात. गावात नमन हा सांस्कृतिक कार्यक्रम  व जाखडी नृत्य  अत्यंत  प्रसिध्द  आहे.

६)  दळणवळणाची साधने -- गावाबाहेरुन चिपळुण ते बोर्या या मार्गाने  दिवसातून  ३/४ एस.टी च्या गाड्या  येतात जातात.त्याचबरोबर  गावात  रिक्षा , टेम्पो, सायकल , मोटारसायकल इ. वाहनांची रेलचेल आहे.तसेच गावात B S N L ,idea, vodafone, इ.मोबाईल सुविधा उपलब्ध आहे .

७)  आरोग्य विषयक सुविधा -- गावात  प्राथमिक  आरोग्य  केंद्र  नाही. परंतु  आरोग्य सेविका सर्वांच्या  आरोग्याची  काळजी घेतात.साथीच्या रोगावर  नियंत्रण  वेळेवर केले जाते.पाण्याचे  प्रदुषण टाळण्यासाठी मेडिक्लोरचे वाटप केले जाते.लहान मुले व गरोदरमाता योग्य  तपासणी  वेळेवर केली जाते.मोठ्या  आजारांकरिता देवघर, मार्ग  ताम्हाणे,चिपळुण, गुहागर येथे रुग्णास हलवले जाते.